लखीमपूर शेतकऱ्यांना वाहनाने चिरडून टाकण्याच्या निषेधार्थ : महाविकास आघाडीच्या वतीने ११ ऑक्टोबरला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक

मुंबई : उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे शेतकऱ्यांना वाहनाने चिरडून टाकण्याच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने ११ ऑक्टोबरला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक देण्यात आली आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी शनिवारी संयुक्त पत्रपरिषदेत ही घोषणा केली. लखीमपूरमधील घटनेवरून राज्यातील जनतेच्या भावना तीव्र असून सोमवारच्या बंदमध्ये त्या निश्चितपणे दिसतील, असा दावा शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते खा. संजय राऊत, राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते मंत्री नवाब मलिक आणि काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी पत्रपरिषदेत केला. राऊत म्हणाले, शिवसेना या बंदमध्ये पूर्ण ताकदीने उतरणार आहे. लखीमपूरमध्ये संविधानाची हत्या झाली. अन्नदाता शेतकऱ्याला संपविण्याचे षडयंत्र सुरू आहे. महाविकास आघाडी भक्कमपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, हे कडकडीत बंद पाळून दाखवून देऊ. लोक स्वयंस्फूर्तीने बंद पाळतील. जीवनावश्यक सुविधांना बंदतून वगळण्यात आले आहे.नवाब मलिक म्हणाले, लखीमपूरची घटना जलियानवाला बाग हत्याकांडासारखी आहे असे आमचे नेते शरद पवार यांनी म्हटलेलेच आहे. शेतकऱ्यांची हत्या घडवून आणणाऱ्या पक्षाला बंदद्वारे चोख उत्तर दिले जाईल. रविवारी मध्यरात्रीनंतरच बंद सुरू होईल. सचिन सावंत म्हणाले, लखीमपूरची घटना मानवतेला काळिमा फासणारी आहे. भाजपकडून मारेकऱ्यांचा बचाव करण्याचा घृणास्पद प्रकार सुरू आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad