ऊसाची एकरकमी द्या : पवार म्हणाले, गुजरातकडे बघा, शेतकऱ्यांचा कसा फायदा झाला?

सोलापूर: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत सातत्याने ऊसाला एकरकमी भाव देण्याची मागणी करत आहेत. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शेट्टी आणि खोत यांना टोला लगावला आहे. हा टोला लगावता पवारांनी या दोन्ही नेत्यांना गुजरातचं उदाहरण दिलं आहे.

▶️शरद पवार आज सोलापुरात होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. मी साखर कारखानदार नाही. तुमचे मत असेल तर मी त्यासाठी आग्रह धरेन. उसाला एक रकमी रक्कम द्या असा एक शब्द निघालाय. ऊस गेला की रक्कम द्या अस म्हणतात. ऊस घातला की साखर तयार झाली आणि ती विकली जाते असे होत नाही. कारखान्यात वर्षानुवर्षे साखर पडून राहते. गुजरातमध्ये पहिला, दुसरा, तिसरा हप्ता केल्यामुळे शेतकऱ्यांना फायदा झाला. एक रकमीमध्ये शेतकऱ्यांचे हित किती हे पाहिले पाहिजे, असं पवार म्हणाले.

▶️नोटिसा कशासाठी?
12 हजार कोटींचा दंड साखर कारखान्यांनी भरायला पाहिजे. या नोटिसा कशासाठी आहेत? या साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जास्त पैसे दिले आहेत. यामुळे सहकारी साखर कारखानदारी उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. उत्तर प्रदेश मध्ये जास्त पैसे दिल्यावर कर लागत नाही. इकडे मात्र टॅक्स आणि दंड लावला जातो. हा काही न्याय नाही, असंही ते म्हणाले.

▶️सरकार निधी देत नाही
दिल्लीवरून राज्य सरकारला रोज अनेक गोष्टींवरून त्रास दिला जात आहे. केंद्र सरकार इकडून कर गोळा करते. मात्र राज्याला त्याचा वाटा देत नाही. आज देऊ, उद्या देऊ असं करत आहेत. अतिवृष्टीचे पैसेही केंद्र सरकार देत नाही. अतिवृष्टीचे पैसे देताही आज देऊ, उद्या देऊ करत आहेत. मी मंत्री असताना गुजरातला निधी देऊ नका असं मला सांगितलं जात होतं. पण मी मात्र देश चालवण्याची जबाबदारी आपली आहे. त्यामुळे संकुचितपणा न ठेवता मदत केली. मी गुजरातमध्ये कोणता पक्ष सत्तेवर आहे हे पाहिले नाही. तिथल्या लोकांशी बांधिलकी ठेवली. आता मात्र परिस्थिती वेगळी आहे, असं त्यांनी सांगितलं.

▶️एकही वाहन रस्त्यावर येता कामा नये.
देशात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्यात महाराष्ट्र कुठे आहे असं लोक विचारतात. त्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्यांची बैठक झाली. त्यात 11 तारखेला महाराष्ट्र बंद ठेवायचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे या बंदमध्ये सहभागी व्हा. एकही वाहन रस्त्यावर येता कामा नये. कायदा हातात न घेता देशाला संदेश द्यायचा आहे. केंद्र सरकारला धडा शिकवायचा आहे, असं ते म्हणाले.

▶️वाढत्या महागाईला भाजपच जबाबदार
यावेळी पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीवरूनही त्यांनी केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली. जगात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती स्वस्त झाल्या आहेत. तरीही इकडे किंमती रोज वाढताना दिसत आहेत. या महागाईला भाजप सरकार जबाबदार आहे. त्यामुळे 11 तारखेचा बंद महत्त्वाचा आहे. सोलापूर जिल्हा हा अन्यायाविरोधात लढणारा आहे. त्यामुळे हा बंद यशस्वी करा, असं आवाहन त्यांनी केलं.

 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

बातमी व जाहिराती साठी संपर्क :