लोहोणेर ( प्रतिनिधी ) : -बळीराजा वर वारंवार येणारे अस्मानी संकट त्याच बरोबर सुलतानी संकटे वेळोवेळी येत असल्याने शेती व्यवसाय धोकादायक ठरू शकतो म्हणून शेतीला पूरक व्यवसाय सुरू करावा म्हणून गेल्या वीस दिवसां पूर्वी साक्री येथून आणलेले सहा बोकड व एक शेळी अज्ञात चोरट्यानी शेड मधून चोरून नेल्याचा प्रकार आज सकाळी लोहोणेर येथे उघडकीस आला आहे. यामुळे सदर शेतकऱ्याचे सुमारे चाळीस - पंचेचाळीस हजारांचे आर्थिक नुकसान झाले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, लोहोणेर येथील शेतकरी सुधाकर बापू महाजन यांची लोहोणेर - खालप रस्ता लगत (गट नंबर १३) शेती आहे. महाजन कुटूंबीय मळ्यातच वास्तव्यास असल्याने त्यांनी शेतीला जोड धंदा म्हणून गेल्या वीस दिवसां पूर्वी साक्री येथून काही बोकड व शेळी विक्री साठी आणले होते. काल मध्य रात्रीच्या वेळी चारी बाजूंनी बंद असलेल्या शेड मधून अज्ञात चोरट्यांनी शेड मध्ये बांधलेले सहा बोकड व एक शेळी लंपास केले आहेत. सकाळी महाजन कुटुंब चारा - पाणी करण्यासाठी शेड मध्ये गेले असता सदर प्रकार निदर्शनास आला. विशेष बाब म्हणजे चोरीस गेलेल्या बोकड व शेळी सोबत काही आजारी शेळी व बोकडला मात्र या चोरट्यांनी हात न लावता निघून गेले. विक्रीसाठी आणलेले ६ बोकड व एक शेळी चोरीला गेल्याने महाजन कुटूंबियांचे सुमारे चाळीस हजारांचे आर्थिक नुकसान झाले आहे. या चोरी मुळे पशु पालकां मध्ये भीती व्यक्त केली जात असून शेतकऱ्यांनी पशुधन पाळावे किंवा नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.