जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना टाळण्यासाठी लसीकरण करण्यापूर्वी, मास्क परिधान करणे हाच प्रभावी उपाय असल्याचे सांगितले होते. सध्याचा काळ असा आहे की, प्रत्येकाने मास्क घालणे आवश्यक आहे. परंतु, इस्राईल (Israel) हा जगातील पहिला असा देश बनला आहे, जिथे आता मास्क घालण्याची सक्ती नसल्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याच्यापाठोपाठ अमेरिकेतील आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 8 कोटी 7 लाख लोकांना कोरोनावरील लस देण्यात आली आहे. एकूण लस घेतलेल्यांपैकी 77 जणांचा मृत्यू झाला आहे. लसीकरणानंतर मृत्यूचं प्रमाण 0.00005 टक्के इतकं आहे, तसेच लसीकरणानंतर लक्षणं दिसून येण्याचं प्रमाण 0.0005 टक्के आहे. लस घेतल्यानंतर 10 लाख व्यक्तींपैकी केवळ 3 जणांना हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावं लागलंय.
अमेरिका कोरोनामुक्तीच्या दिशेने ...
अमेरिकेत सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यातच अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी मोठी घोषणा केलीये. ज्यांनी कोरोनावरील लशीचे दोन्ही डोस घेतले आहेत, त्यांना मास्क घालण्याची आवश्यकता नाही, असं त्यांनी जाहीर केलंय. त्यामुळे लसीकरणामुळे अमेरिकेला मोठा फायदा झाल्याचं दिसून येतंय. अमेरिकेत सध्या 25 टक्के लोकांचे लसीकरण झाले आहे. काही निर्बंधही शिथिल करण्यात आले आहेत.
इतर युरोपीयन देशांमध्ये लसीकरणाचे चांगले परिणाम दिसून येत आहेत. भारतात 1 मे पासून 18 वर्षांपुढील सर्वांना लस मिळण्यास सुरुवात होईल. अनुकूल परिणाम दिसण्याची आशा आहे.