देवळा प्रतिनिधी - आई-वडील नसणाऱ्या अनाथ व निराधार मुलांना शिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्यासह इतरही मदत करण्यासाठी पुणे येथील शिवनिश्चल सेवाभावी ट्रस्टच्या वतीने गरजू मुलांना मदतनिधी वाटपाचे कार्यक्रम दरवर्षी घेतले जात असले तरी या उपक्रमाची सुरुवात देवळा शहरातून करण्यात येते.
यावर्षीही हा मुख्य मदतनिधी वितरण सोहळा ५ सप्टेंबर २०२१ रोजी होणार आहे. या कार्यक्रमास प्रसिद्ध अभिनेत्री अश्विनी महांगडे, महाराष्ट्र राज्य टायगर ग्रुपचे अनिकेत घुले माजी राज्यमंत्री व शेतकरी नेते रविकांत तुपकर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती शिवनिश्चल सेवाभावी ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष व प्रसिद्ध शिवव्याख्याते प्रा. यशवंत गोसावी यांनी देवळा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत आज शनिवार (दि.२८) रोजी दिली.
संस्थेच्या कार्याविषयी अधिक माहिती देताना प्रा. गोसावी म्हणाले कि, शिवनिश्चल सेवाभावी संस्थेच्या वतीने २०१५ सालापासून मदतनिधी उपक्रम सुरु आहे. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांसह अनाथ व निराधार मुलांना मदत दिली जाते. येत्या ५ सप्टेंबर रोजी कर्मवीर रामरावजी आहेर महाविद्यालयाच्या प्रागंणात हा कार्यक्रम होणार आहे.
या कार्यक्रमास आमदार डॉ.राहुल आहेर हे अध्यक्षस्थानी राहणार असून जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष केदा आहेर, प्राचार्य हितेंद्र आहेर, महारोजगार केंद्राचे अध्यक्ष भाऊसाहेब पगार, देवळा मर्चंट बँकेचे अध्यक्ष जयप्रकाश कोठावदे, उमराणे बाजार समितीचे माजी सभापती राजेंद्र देवरे आदि प्रमुख मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. अनाथ मुलांना आर्थिक मदत, शैक्षणिक साहित्य तसेच जीवनावश्यक वस्तूंची मदत यावेळी दिली जाणार आहे.
आपल्या आसपास असे अनाथ व निराधार मुले असतील तर ८४४६४६८४४६ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा आणि या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन प्रा. यशवंत गोसावी यांनी केले. या पत्रकार परिषदेला ट्रस्टचे सदस्य डॉ.डी.के.आहेर, भगवान आहेर, अनिल भामरे, पंकज जाधव आदी उपस्थित होते .
कसमादे मराठी न्यूज 👇
▶️ WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/HdWIMViY7Ac2WW1yP9JFmG
▶️ Facebook :
▶️ YouTube : https://youtube.com/channel/UCI-nplqZxzwxc-YRBV5xOig